केरली टेकक्स “हंगेरीयन अर्जुन”

केरली टेकक्स “हंगेरीयन अर्जुन”


मूळ कथा स्त्रोत : निर्भीड.कॉम

( https://www.nirbhid.com/2018/07/KarolyTakacsdevavasthi.html )


आपल्याकडे आज “केरली टेकक्स” हे नाव फार कुणाला माहित असण्याची शक्यता नाहीच्याच घरात आहे. परंतु त्याची यशोगाथा वाचल्यावर तुम्ही त्याला कधीही विसरु शकणार नाही हे नक्की ! तो तुम्हाला तुमच्या जिवनातील प्रत्येक बिकट प्रसंगासमोर निधड्या छातीने उभे रहायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही कोलमडायला लागलात की “केरली” तिथे तत्काळ हजर होइल अगदी “टेरी” सारखाच ! ( http://www.nirbhid.com/2017/11/terry-fox-story.html ) आणि त्याच्याकड़े पाहून तुम्हाला समोर असलेल्या अप्रिय परिस्थितीला वाकुल्या दाखवण्याची शक्ति नक्कीच मिळेल. हे तितकस सोपे नाहीये हेदेखील खरेच हे त्याची यशोगाथा वाचल्यावर लक्षात येईलच !


२१ जानेवारी १९१० रोजी केरलीचा जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे झाला. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितिमुळे कमी वयातच केरली हंगेरी आर्मी मधे दाखल झाला. सैन्य प्रशिक्षण घेत असतांनाच केरलीसहित वरिष्ठांना केरलिच्या असाधारण अशा नेमबाजीने एक नविन स्वप्न पाहण्याचे कारण दिले. सैन्य प्रशिक्षणा-दरम्यान केरलीला नेमबाजी मधे उत्कृष्ट नेमबाज म्हणून गौरवण्यात आले. मग काय केरलीने आपल्या नेमबाजीचे कौशल्य दाखवत आर्मीमधे व् देशात चांगलेच नाव कमावले. संपूर्ण हंगेरिला केरली माहित तेव्हा झाला जेव्हा त्याने हंगेरीच्या राष्ट्रिय स्पर्धेमध्ये निर्विवाद यश प्राप्त करत नॅशनल चैम्पियनचा किताब आपल्याकडे ठेवला. आता केरलीसहित सर्व देशाच लक्ष्य होत १९३६ च्या ओलंपिक स्पर्धेकडे व् त्या दृष्टीने केरली खुप मेहनत घेत होता. त्याला काहीही करून आपल्या देशासाठी नेमबाजीमधे सुवर्ण पदक मिळविण्याच्या ध्यासाने झपाटून टाकले होते. अंतराष्ट्रीय स्पर्धांचा विजेता असणाऱ्या केरलिच्या ह्या स्वप्नावर घाला घातला तो तेव्हाच्या हंगेरी आर्मीच्या एका नियमाने ! केरली एक सार्जंट होता व् ओलंपिकमधे आर्मीकडून सहभागी होण्यासाठी कमिशन ऑफिसर पातळीच्या सैनिकालाचा परवानगी होती ! परंतु केरली खचला नाही, त्याने आपली मेहनत जिद्दीने सुरु ठेवली व् सातत्याने विविध स्पर्धामधे यश मिळवत राहिला.


ज्या नियमाने केरलिची संधि हुकवली होती तो नियम १९३६ च्या स्पर्धानंतर बदलण्यात आला व् पुन्हा आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी केरली मेहनेतीची पराकाष्ठा करू लागला. आता सर्वांच लक्ष्य १९४० च्या टोकियो मधे होणाऱ्या ओलंपिक स्पर्धांवर होत. केरलिचे सहकारी व् हंगेरी देशवासिय तर केरलीलाच विजेता मानत होते. परंतु नियतीच्या मनात वेगळच काहीतरी शिजत होत.


१९३८ मधे बॉम्ब-निकामी प्रशिक्षणा दरम्यान केरलिच्या त्याच हातात ग्रेनेडचा स्फोट झाला ज्या हाताने त्याला निर्विवाद विजयाचे स्वप्न दाखवले होते. महिनाभर इस्पितळात प्रयत्न करूनदेखिल सर्वांच्या पदरात निराशा पडली. संपूर्ण देशवासी ज्या हाताच्या जादुवर प्रेम करत होते तोच हात केरलिने गमावला ! त्या हाताने केरली कधीही नेमबाजी करू शकणार नव्हता ! एवढा मोठा आघात झाल्यानंतर केरलीने काय कराव ? तुम्ही-आम्ही काय केल असत ? केरलिने आपल्याकडे काय नाही ह्यावर लक्ष न देता सपूर्ण लक्ष आपल्याकडे काय आहे ह्यावर दिले !


म्हणजेच त्याचा डावा हात ! हो, त्याने डाव्या हाताने लढायच ठरवल ! वाचताना हातावरचे केस उभे राहिले न ?

ज्या हाताने त्याने कधी पेन देखिल धरला नव्हता त्या हाताने तो अस्तव्यस्त झालेल्या स्वप्नांच्या तुकडयाना पुन्हा जोडू पाहत होता ! केरलिने डाव्या हाताने सराव सुरु केला, पुन्हा प्रयत्नाची पराकाष्ठा !

१९३९ मधे राष्ट्रिय नेमबाजी स्पर्धेमध्ये जेव्हा केरली पोहोचला तेव्हा इतर सर्व खेळाडूंनी त्याला सहानुभूति दाखवून त्याच स्पर्धा पहाण्यासाठी आल्याबद्दल कौतुक केल, तेव्हा केरली त्यांना म्हणाला “मी पहायला नाही तर खेळायला आलोय” केरलिने त्यांना खरा धक्का तर पुढे दिला ! त्याने पुन्हा नेमबाजिचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले, ते देखिल डाव्या हाताने ! अपघातानंतर एकाच वर्षात !

पुन्हा सर्व देशवासिय केरलीकड़े एक आशेचा किरण म्हणून बघायला लागले. परंतु केरलिचे व् देशाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले ! सर्व मेहनतीवर युद्धजन्य परिस्थितीने पाणी फेरले व् द्वितीय विश्वयुद्धामुळे १९४० व् १९४४ दोन्ही ओलंपिक स्पर्धा रद्द झाल्या ! केरलीकडून नेमबाजी मधे ओलंपिक सुवर्ण पदक हे देश्वासियांचे स्वप्न धुळीस मिळाले असे सर्वजण समजत असताना केरली मात्र आपला सराव नियमित करत होता त्याच जिद्दीने व् त्याच दृढ़निश्चयाने. कशासाठी ? तर १९४८ च्या ओलंपिकसाठी.


वयाच्या ३८ व्या वर्षी केरलिने १९४८ लंडन ओलंपिकची पात्रता फेरी गाठून सबंध हंगेरियन जनतेला पुन्हा एक स्वप्न दाखवले, नुसते दाखवलेच नाही तर ते प्रत्यक्षात उतरवले देखिल. केरलिने नेमबाजीमधील आधीचे सर्व रेकॉर्ड तोडत सुवर्णपदक मिळवले होते, आणि हो केरली इथेच नाही थांबला वयाच्या ४२ व्या वर्षी त्याने पुन्हा १९५२ हेलसिंकी ओलंपिकमधे हंगेरिसाठी सुवर्णपदक जिंकुन पिस्टल गटात सलग २ वेळा सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम केला.

अपंगत्व असुनदेखिल नेमबाजीमधे हा पराक्रम करणारा केरली हा पहिला खेळाडू ठरला !

१९५६ च्या ओलंपिक मधे केरली जरी पद्काची कमाई करू शकला नाही तरी संपूर्ण विश्वासाठी तो कधीच हीरो म्हणून ओळखला गेला होता. १९५८ मधे केरलीने विश्वस्तरीय नेमबाजी चैम्पियन स्पर्धेत ब्रोंझ मेडल मिळवत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. आपल्या संपूर्ण नेमबाजी कारकिर्दीमधे केरलिने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ३५ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे ! आपल्यासमोर आलेल्या अगणित अडथळ्याना पार करत, परिस्थितिला शरण न जाता केरलिने जे मिळवल आहे ते आपल्यासारख्या,,,,, “प्रत्येक अपयशासाठी दैव व् नशिबाला दोष देणाऱ्या धष्टपुष्ट अपंगाना पुन्हा उठून लढण्याची शक्ति दिल्याशिवाय राहत नाही”


मूळ कथा स्त्रोत : निर्भीड.कॉम

( https://www.nirbhid.com/2018/07/KarolyTakacsdevavasthi.html )

Recent Posts

See All

उपकार कोणावर करावे ?

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांन